एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झालेला आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारातील काही रक्कम जमा झाली होती. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात संपूर्ण पगार जमा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५६ टक्के पगार जमा झाला होता. आज सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे उर्वरित वेतन (४४%) त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे.
बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी खाजगी विकासकांच्या माध्यमातून बांधा- वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर राज्यातील एसटीच्या बहुतांश जागा विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६६ जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागे सह तालुका स्तरांवरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा ३ जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागा देखील चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येत असून त्याठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतं आहेत. यंदा २६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी ११३ आगारात ८०० पेक्षा जास्त नवीन बसेस प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. सध्या ३ हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील. त्यामुळे भविष्यात शहरापासून गाव खेड्यांपर्यंत, महानगरापासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.