संग्रहित फोटो
बारामती : शहरातील नीरा डावा कालव्या लगत असलेल्या खत्री इस्टेटमध्ये (Dog Attack on Child) दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दीड वर्षांची चिमुरडी जखमी झाली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.23) सकाळी घडली. या घटनेने बारामती शहारातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जीवावर उठल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती शहारातील खत्री इस्टेटमधील जगदाळे कुटुंबातील दीड वर्षांची मुलगी अश्वी सकाळी घरात खेळत होती. खेळता खेळता ती घराच्या अंगणात आली. त्याच वेळेत तेथे असलेल्या दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी अचानकच तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या या हल्ल्याने अश्वी जीवाच्या आकांताने ओरडली. तिच्या आवाजाने जगदाळे कुटुंबीय तातडीने धावून आल्याने तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. सुरूवातीला कुटुंबियांनाही क्षणभर काही समजले नाही. कुत्र्यांची झुंड एकदम अश्वीच्या अंगावर धावून आल्यानंतर कुटुंबियांचीही पळापळ झाली.
तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवेपर्यंत वीस ठिकाणी कुत्र्यांनी तिला चावा घेतला होता. तिची ही अवस्था पाहून कुटुंबिय व शेजारील नागरिकांनी तिला तसेच उचलून तातडीने बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र मुथा यांच्या मुथा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी अश्वी हिच्यावर उपचार केले. सुदैवाने तीला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे बारामती शहारातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नागरीकांच्या जीवावर बेतू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.