File Photo : Suicide
बुलडाणा : बुलडाण्यातील मच्छी ले-आऊटमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारच्या सुमारास घडली. जोहना तब्बसुम (वय 17) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या तरूणीने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
जोहना तब्बसुम ही विद्यार्थिनीच्या जेवण्याची वेळ झाल्याने वडील रियाज सैय्यद मुलीच्या खोलीजवळ गेले होते. तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले होते. त्यांनी आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांची मुलगी जोहनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. ओढणीच्या साहाय्याने तिने स्वतःला फास लावून घेतला होता.
जोहना नीटची परीक्षा रिपीट केल्यानंतरसुद्धा तिला कमी मार्क्स मिळाल्यामुळे ती तणावात असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिला अभ्यासाचे टेंशन होते. मागील काही दिवसांपासून ती प्रचंड तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. तिचे वडील देऊळघाट येथे शिक्षक आहेत.