(Photo - Social Media)
सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे 50 रुपये किलो दराने मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने दर वाढल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे. दरम्यान, या वाढत्या दराचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांनाही होईल, असा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.
सोलापुरात बोलताना भरणे यांनी सांगितले की, साखरेचा भाव सध्या सुमारे 75 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकांच्या कर्जामुळे अनेक साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या कारखान्यांकडे तुलनेने जास्त साठा आहे, त्यांना या दरवाढीचा अधिक फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर साखर साठवणुकीची क्षमता मर्यादित असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा काही लाभ मिळू शकतो, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राज्यातील काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांमध्ये पाणी उपलब्ध असले तरी कालव्यांची क्षमता आणि वितरणाच्या मर्यादांमुळे गरजेनुसार सर्व भागांमध्ये पाणी पोहोचवणे शक्य होत नसल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस पडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पाऊस झाल्यास साठवण तलाव आणि पाझर तलाव भरतील आणि शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निमगाव येथील वावडी महोत्सव आणि हिरकणी मेळाव्यात तरुणांशी संवाद साधताना भरणे यांनी आपल्या मोकळ्या स्वभावाबद्दलही भाष्य केले. आपल्या कृतीमुळे इतरांना आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. वरातीत तरुणांसोबत नाचणे असो किंवा मुलांनी आग्रह केल्यावर त्यांच्यासोबत गोट्या खेळणे असो, लोकांना आनंद मिळत असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे, असे भरणे म्हणाले. ‘आयुष्य एकदाच मिळते; स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या,’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला.






