बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाची तयारी झाली आहे. राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार राज्यसभेमध्ये जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. आज (दि.13) दुपारी सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार आहेत.
सुनेत्रा पवार यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. सुनेत्रा पवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना संसदेत मागील दाराने पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे पक्षातील भुजबळ समर्थक देखील नाराज झाले आहेत.
लोकसभेनंतर आता राज्यसभा
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही पवार कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली. मात्र सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीचा गड राखला. यानंतर आता सुनेत्रा पवार या मागच्या दाराने संसदेमध्ये जाणार आहेत. लोकसभेमध्ये पराभूत झाल्या असल्या तरी सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार होणार आहेत.