मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज कारागृहातूनच विशेष न्यायालयाकडे केला. शुक्रवारीच्या सुनावणीला माने आणि अन्य आरोपी व्हिसीमार्फत न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी माने यांनी माफीचा साक्षीदाराबाबत लिहिलेल्या अर्जाचा उल्लेख केला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी माने यांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश एनआयएला दिले.
पश्चाताप माफीचा साक्षीदार होण्याचे मुळ कारण
कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी अर्जात नमूद केले आहे. २६ वर्षांच्या कारकिर्दीत कामगिरीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले. केंद्र तसेच राज्य सरकारचे २८० पुरस्कार मिळाले. दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून चुका झाल्या त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी पीडितांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी म्हटले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाकडे माफीची मागणी केली आहे.
वाझे यांच्यासह अन्य आरोपींचा अर्जाला विरोध
या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेसह अन्य आरोपींच्या वकिलांनी माने यांच्या अर्जाला विरोध केला आहे.






