वडगाव मावळचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके (फोटो- टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र अनेक इच्छुकाना उमेदवारी न दिली गेल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता वडगाव मावळचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मावळ पॅटर्न’ हा चार कुटुंबांपुरता मर्यादित असून ठराविक लोकांविरुद्ध संपूर्ण जनता अशी ही लढाई असून आपण एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही आडनावाच्या विरोधात ही निवडणूक नाही.पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.