Photo Credit : Social Media
पुणे: पुणेकरांना दहशतमुक्त वातावरण देण्याचा पुणे पोलिसांचा ‘दावा’ फोल ठरवत पुन्हा कोयतेधाऱ्यांनी दहशत माजवण्यास सुरूवात केली आहे. अचानक चार-दोघांचे टोळके हुल्लडबाजी अन् आरडाओरडा करत शांत परिसराला क्षणात दहशतीचे स्वरूप आणत हवेत कोयते फिरवून सर्वसामान्य पुणेकरांच्या वाहनांचे खळखट्याक करत आहेत. वाहनांसोबतच किरकोळ वादातून हे टोळके दुकानांची तोडफोड करत आहेत. गेल्या सात महिन्यात तोडफोडीच्या 67 घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यात परिमंडळ चार व पाचमध्ये तोडफोडीच्या सर्वाधिक घटना घडल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
शांतता प्रिय पुण्याची ओळख बदलत्या काळात वाढत्या गुन्हेगारांमुळे वेशीवर टांगली गेली आहे. टवाळखोर तसेच नव्याने गुन्हेगारीत आलेल्या तरुणांकडून गुन्हेगारीची दहशत कायम ठेवली जात आहे. तत्पुर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार घेताच या वाढीव गुन्हेगारांना सज्जड दम दिला होता. परंतु, गुन्हेगारांनी आपली दहशत कायम ठेवल्याचे पाहायला मिळत असून, किरकोळ कारण, जुने वाद व दहशतीसाठी वाहनांची तोडफोड सुरू आहे.
येरवडा परिसरात ‘मर्डर’ झालेल्या तरुणाच्या चाहत्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास गोंधळ घालत दुचाकी व रिक्षांची तोडफोड केली. अचानक झालेल्या याप्रकाराने दहशतीचे वातावरण पसरले. त्यापुर्वीच्या रात्री कोयता गँगने लष्कर परिसरात वाईन शॉपचीही तोडफोड केली. यासोबतच काही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत देखील तोडफोडची घटना घडली. सातत्याने या घटना शहरात घडत असल्याने सर्व सामान्य पुणेकर दहशतीच्या छायेत आहेत. त्यात वाहनांचे नुकसानाचा भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. पुणेकर झोपेत देखील या घटनांमुळे बेचैन आहेत. वाहन चोरी, तोडफोड अशा मानसिक तणावातून पुणेकर जात असताना या घटनांना लगाम लावण्यात पुणे पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. तर पुणे पुन्हा कोयता गँगच्या दहशतीत वावरत आहे.
परिमंडळ एकम मध्ये चार, परिमंडळ दोन मध्ये आठ परिमंडळ तीन मध्ये 12, परिमंडळ चारमध्ये 15, परिमंडळ पाचमध्ये 28 तोडफोडीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
वाहन तोडफोडप्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग कायम आहे. शहरात गेल्या सात महिन्यात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये ५५ अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले आहे. यासोबतच सव्वा दोनशे जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील अनेकजन फरार आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही.
शहराचा उपनगर व वाढत असलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिमंडळ चार व पाचमध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यातही येरवडा भागात तब्बल १० त्याखाली हडपसर व कोंढवा परिसरात प्रत्येकी ८ घटना घडल्या आहेत. वानवडी, पर्वती यामध्ये देखील तोडफोडीच्या घटनांची संख्या मोठी आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “वाहन तोडफोड सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. परिसरात पेट्रोलिंग व गस्त देखील वाढवली आहे. आरोपीविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. यापुढे कोणतीही घटना घडणार यासाठी आम्ही दक्ष आहोत.”