हिंदू नववर्षा निमित्त कल्याण पूर्वेत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत खासदार श्रीकांत शिंदे यांची अनुपस्थिती पाहावयास मिळाली. तर दुसरीकडे या शोभा यात्रेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर शोभा यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभेच्या जागेकरीता कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला हाेता. कल्याण लोकसभेची जागा भाजपला मिळाली नाही तर काम करणार नाही ही भूमिका घेतली होती. काही तासाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण लोकसभेसाठी खासदार शिंदे यांची उमेदवारी जाहिर करावी लागली. त्यानंतर कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गायकवाड यांच्या तिसाई कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्या काही समर्थकांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, आम्ही खासदार शिंदे यांचे काम करणार. आमच्यात काही मतभेद नाही. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी कल्याण पूर्वेतील नववर्ष स्वागत यात्रेत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेत भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी झाल्या होत्या. या यात्रेत ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर देखील सहभागी झाल्या होत्या. दरेकर आणि सुलभा गायकवाड हे एकत्रित दिसल्याने हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतकेच नाही तर या स्वागत यात्रेत महायुतीचे उमेदवार खासदार शिंदे अनुपस्थित होते. या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, आजचा दिवस हा सांस्कृतिक दिवस आहे. त्याला राजकारणाची किनार देऊ नये. सगळ्यांना निमंत्रण आहे. त्यामुळे सगळेच जण सहभागी झाले. सगळेच जण येऊन गेले.