मुंबई:गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही तशीच फूट पडली आहे. (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) बहुसंख्य आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशाच प्रकारचा खळबळजनक दावा ठाकरे गटातील आमदार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच.. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?#MaharashtraPoliticsCrisis — Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2023
“राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय 100 (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच…”, असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.
अंबादास दानवे यांच्या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खोक्यांवरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून खोक्यांचा वापर केला जातोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 शिवसेनेतून बंड केल्यानंतर ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणांनी महाराष्ट्र दणाणून गेला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी 100 खोके दिले, असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यात खोक्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा थेट राष्ट्रवादीवरच दावा
शिवसेनेतून बंड केल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगात धाव घेत त्यांनी शिवसेना नाव पक्षचिन्हावर ताबा मिळवला. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीसुद्धा अशाच प्रकारचा दावा केला असून आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील हा वाद आता निवडणूक आयोगात जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेत 53 आमदार आहेत. पक्षावर दावा सांगण्यासाठी यातील एक तृतीयांश आमदार अजित पवार यांच्याकडे असणे आवश्यक आहे. सध्या आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.