मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आता चिघळताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी तर या मुद्द्यावरून गरज पडल्यास शिवसेना कर्नाटक सरकारची नाकाबंदी करणार, असा इशारा दिला आहे.
सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती गावांमध्ये कर्नाटकचा ध्वज दोनदा फडकावण्यात आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. आज याबाबत भूमिका मांडताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, कर्नाटक भाजपकडून महाराष्ट्र तोडण्याच काम सुरू आहे. अशा स्थितीत त्याला प्रतिबंध करणे हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे. पण, दुर्दैवाने मुख्यमंत्री शिंदे हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. त्यामुळेच कर्नाटकमधील भाजपच्या सरकारकडे ते जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत.
खासदार विनायक राऊत म्हणाले, कर्नाटक सरकार महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघालेले असताना शिंदे सरकार मौनात आहे. मात्र, आजही शिवसेना पूर्वीप्रमाणेच या मुद्द्यावर फ्रंटफूटवरच लढणार आहे. शिवसेना गप्प बसणार नाही. गरज पडली तर कर्नाटकची नाकेबंदी करायलाही शिवसेना मागेपुढे पाहणार नाही. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे न थांबवल्यास कर्नाटकची नाकेबंदी करणार, असा इशाराही राऊतांनी दिला.
खासदार विनायक राऊत म्हणाले, सीमा भागातील ग्रामस्थांना भडकवण्याचे काम कर्नाटक सरकार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सीमा रेषेवरील महाराष्ट्रातील गावांना आंध्र प्रदेशमध्ये येण्याची लालूच दाखवली जात आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, शिंदे सरकार केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी वेगवेगळ्या ज्योतिष्यांकडे जाऊन हात दाखवण्याचे उपद्वव्याप करत आहे. उद्योगमंत्री कामाख्या देवीला जातात आणि मोठी डरकाळी फोडतात की आमच्याकडे आणखी उद्योग येणार आहेत. नसते उद्योग करत फिरण्यापेक्षा चांगले काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे काम शिंदे सरकारच्या माध्यामातून भाजप करत आहे.