ठाणे महानगरपालिकेचा दणका ! अखेर शास्त्रीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अधिक गती मिळाली असून, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या स्पष्ट निर्देशानुसार शहरातील विविध भागांमध्ये कारवाई केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत लोकमान्य सावरकर नगर परिसरातील शास्त्रीनगर नाल्यावर सुरू असलेले चार अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकतेच निष्कसित केले आहे. हे बांधकाम कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू करण्यात आले होते.
कारवाईदरम्यान संबंधित बांधकाम पूर्णपणे हटवून परिसर पुन्हा पूर्ववत करण्यात आला. याशिवाय, याच परिसरातील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यालगत, हत्तीपुलाजवळ व शास्त्रीनगर भागात उभारण्यात आलेल्या विट-सिमेंटच्या आठ पिलर्ससह त्याखालील सिमेंटचा कोबा, तसेच पाच गाळ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विटसिमेंटच्या भिंतींवर देखील कडक कारवाई करण्यात आली. ही सर्व अनधिकृत संरचना जे.सी.बी. मशिन व मनुष्यबळाच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आली.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मलेरियाचं थैमान; आठवड्यात आढळले १०० रुग्ण, तिघांचा मृत्यू
ही महत्त्वपूर्ण कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई वेळी लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे, अतिक्रमण निरीक्षक, अभियंते, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
महापालिकेने वारंवार सूचना करून देखील संबंधितांनी अनधिकृत बांधकाम थांबवले नसल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधकाम केल्यास यापुढे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील महापालिकेने दिला आहे.
ही कारवाई केवळ अतिक्रमण हटवण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी केलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागांकडून परवानगी घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा बांधकामांवर तात्काळ कारवाई केली जाईल.