ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : देशाचा ७९वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या १० प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा तसेच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात, अंजना विजय खिलारे, पुजा अविनाश कोटीयन, पुष्पा दादा बनसोडे, भारती किशन चिमटे, उज्जैन रतन पाटील, विलास बाबाजी मढवी, पुरुषोत्तम जान्नप्पा पुजारी, शंकर नरसप्पा हनुमंता, अरुण गोपीनाथ पाटील, पोपट निवृत्ती केंगार या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच, खारटन रोड हिराकोट येथील खूप जुनी व मोठी कचरापेटी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उप मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक संजू रणदिवे, मुकादम विठ्ठल किर्तने, सुपरवायझर शिवाजी पाटील यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी, उपायुक्त (घनकचरा) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी, आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले. ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना, तसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
‘घरोघरी तिरंगा २०२५’ या अभियानाच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेच्यावतीने ०९ ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध या स्पर्धा, तिरंगा यात्रा, सायकल रॅली, देशभक्तीपर गीत आणि नृत्य यांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी, तिरंंगा सेल्फी आदी उपक्रमांचा समावेश होता. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ११ जुन्या कचऱ्याच्या जागा साफ करून तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले.