फोटो सौजन्य - Social Media
स्नेहा जाधव, काकडे: ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन 11 मे 2025 रोजी करण्यात आले. केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेचे परीक्षण करण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून ड्रिलची सुरुवात झाली आणि पूर्वनियोजित घटनाक्रमानुसार संपूर्ण कार्यवाही पार पडली.
या मॉक ड्रिलमध्ये काल्पनिक एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तातडीने सूचना प्रसारित करण्यात आल्या. नागरिकांनी कोणताही गोंधळ न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले. शोध मोहिमेद्वारे 40 जखमी व अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना त्वरित प्रथमोपचार देण्यात आला. याशिवाय इमारतीत अडकलेल्या 5 जणांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
या मॉक ड्रिलचे निरीक्षण जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, विविध यंत्रणांचे अधिकारी, होमगार्ड, अग्निशमन दल, पोलीस व लोढा अमारा गृह संकुलातील सुरक्षा कर्मचारी यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग होता. मॉक ड्रिलदरम्यान कोणतीही अफवा पसरली नाही आणि नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला. प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी नागरिकांना ही केवळ तयारीची चाचणी असल्याचे सांगत सहकार्याबद्दल आभार मानले.
या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य अग्निशमन अधिकारी निलेश झलके, ममता डिसूझा, डॉ. अनिता जवंजाळ आदी अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलमधून प्रशासन आणि नागरिक दोघेही आपत्कालीन परिस्थितीला सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.