अंबरनाथ नगरपालिकेवर आज भटक्या विमुक्तांचा धडक मोर्चा निघाला होता. पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवर वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाज बांधवांनी आपल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी अंबरनाथ नगरपालिकेवर हा धडक मोर्चा काढला होता. पारंपरिक वेशभूषेत आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी अंगावर चाबकाचे फटके, हातात तुणतुणे, संभळ वाजवून नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुलाबाळांसह हे बांधव नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी नागपंथी डावरी गोसावी भटक्या विमुक्त समाजाचे नेतृत्व करणारे भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त बांधव अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे आपले गाऱ्हाणे मांडले. वस्तीत पायवाटा, गटारे, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासनाने पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागपंथी डावरी, गोसावी, समाजाच्या शिष्ठमंडळाने आरपीआय नेते श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाला निवेदन दिले.