राज्यात 443 लाचखोर गजाआड, शासकीय कार्यालयांना लाचखोरीची वाळवी
राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात 5 टक्याने वाढ झाली आहे. 2025 या वर्षात गेल्या पाच महिन्यात 304 गुन्हे दाखल करण्यात आले असून 443 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. राज्यात यंदाच्या वर्षी 22 मे 2025 पर्यंत एसीबीने केलेल्या कारवाई मध्ये सर्वाधिक 57 गुन्हे उत्तर महाराष्ट्र विभागात नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ 54 गुन्हे पुणे विभागात नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर मराठवाडा विभागात 47, कोकण विभागात 41, विदर्भ 34 आणि नांदेड विभागात 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हगवणेच्या वकिलांचा उलटा हल्ला: ‘ती नको त्या व्यक्तीसोबत…’; युक्तिवादात वैष्णवीच्या इभ्रतीला धक्का
2024 या वर्षीच्या जानेवारी ते मे या कालावधीत एसीबी विभागाकडून राज्यात एकूण 284 गुन्हे दाखल करण्यात येऊन 417 लाचखोरांना अटक करण्यात आली होती. तर 2025 वर्षात जानेवारी ते 22 मे या कालावधीत 304 गन्हे दाखल करण्यात आले असून 443 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग यंदा देखील लाचखोरीत अव्वल क्रमांकावर राहिला आहे. त्यापाठोपाठ पोलीस खात्याचा क्रमांक लागतो. एकूण गुन्ह्यांपैकी 82 गुन्हे महसूल विभागाशी संबंधित आहेत. तर लाच घेण्यात दुसरा क्रमांक पोलिसांचा लागतो. पोलीस विभागाशी संबंधित 43 गुन्हे 22 मे 2025 पर्यंत दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यातील वीज वितरण कंपनी लाचखोरीत तिसऱ्या क्रमांकावर असून आता पर्यंत 20 लाचखोरीच्या घटना वीज वितरण विभागात घडल्या आहेत. त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेत 13 लाचखोरीचे गुन्हे घडले आहेत.
कोकण क्षेत्रातील सहा विभागातून सर्वाधिक लाचखोर ठाण्यातून अटक करण्यात आले आहेत. कोकण परिक्षेत्रात राबवण्यात आलेल्या कारवाईत 1 जानेवारी ते 22 मे 2025 या कालावधीत एकूण 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात 56 लाचखोर आरोपींना गजाआड व्हावे लागले आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी सहा जिल्ह्यांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. या सहा विभागातून सर्वाधिक गुन्हे ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. तर त्या पाठोपाठ पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.