BADALAPUR | सुशिक्षित तरुण युट्युबवर व्हिडीओ पाहून बनला चैन स्नॅचर !
तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं या जगात कोणतंही ज्ञान मिळवणं सोपं झालं आहे. मात्र याची जशी चांगली बाजू आहे तशीच वाईट बाजू देखील आहे. चक्क युट्यूबवर व्हिडीओ पाहून एका तरुणाने बदलापुरमध्ये चोरी करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापुर आणि असपासच्या परिसारात चोरीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आता महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या चोरट्याला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दरम्यान व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चोरट्य़ाचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे. ऑटोमोबाईलच प्रशिक्षण घेतलेला .या तरुणाला चोरीच्य़ा आरोपाखाली पोलिसांनी बेड्य़ा ठोकल्या आहेत. युट्युबवर सोनसाखळी खेचण्याचे व्हिडीओ पाहून या भामट्याने बदलापुरात हैदोस घातला होता. गेल्या पंधरा ते वीस दिवसात या भामट्याने ५ सोनसाखळी चोरीच्या घटना केल्या. साधारणपणे सोनसाखळी खेचणारे चोरटे एका दुचाकीवर दोन तरुण असतात, मात्र दृषांमध्ये दिसणाऱ्या या पठ्याने तर कमालच केलीये, एकट्याने पायी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून हा भामटा एका हाताने दुचाकी चालवून दुसऱ्या हाताने सोनसाखळी खेचून पोबारा करायचा. बदलापुरात या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर त्याला पकडण्याचं आव्हान होतं.
अखेर हा भामटा एकट्याने पायी जाणाऱ्या महिलांवर नजर ठेवून चोरीच्या तयारीत होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्यावर संशय आला. नाकाबंदी दरम्यान बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या हालचालींवर संशय येताच त्यांनी तात्काळ या संशयित तरुणाची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना कळवली, पोलिसांनी पाठलाग करून बदलापूर पूर्वेच्या गांधी चौकात या भामट्याच्या मुसक्या आवळल्या. प्रवीण प्रभाकर पाटील (३९) असं या भामट्याच नाव असून तो कर्जत तालुक्यातील शेलु येथील रहिवासी आहे.
बनावट नंबरप्लेट असलेल्या दुचाकीने तो सोनसाखळी चोरीच्या घटना करत असल्याचं पोलीस तपासात उघड झाल. त्याच्याकडून पोलिसांनी बदलापुर पूर्व येथील सोनसाखळी चोरीचे २ गुन्हे आणि पश्चिम येथील ३ गुन्हे अशा पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच त्याच्याकडून जवळपास २ लाख २७ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अशी माहिती माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजेश गज्जल करीत होते. यावेळी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण, प्रशांत थिटे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.