कल्याण डोंबिवलीमध्ये गुन्हेगारी वाढत जात चालली असून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. याचपार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. राजेंद्र जाधव असे चोरट्याचं नाव असून तो डोंबिवली येथे राहणारा आहे. राजेंद्र कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात या आधी देखील डोंबिवली ,मानपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली .राजेश कडून चोरी केलेल्या चार रिक्षा कोळसेवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
कल्याण पूर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरीच्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते . या दरम्यान रिक्षा चोरी करणारा सराईत चोरटा राजेश जाधव डोंबिवलीत राहत असल्याची माहिती मिळताच पोलीसांच्या पथकाने राजेश जाधव याला ताब्यात घेतलं . पोलीसी खाक्या दाखवताच जाधवने रिक्षा चोरीची कबुली दिली . पोलिसांनी राजेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
राजेश जाधव याच्याकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्यात . राजेश कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पार्किंग मध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचा आणि त्या रिक्षा कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात याआधी देखील डोंबिवली, मानपाडा, कोळशेवाडी परिसरात रिक्षा चोरी संदर्भात गुन्हे दाखल आहेत . त्याला याआधी देखील रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा रिक्षा चोरी करणं सुरू केलं . राजेशने आणखी काही रिक्षा चोरी केला असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
गेल्या वर्षी कल्याण परिसरात किती गुन्ह्यांवर कारवाई या बाबतदेखील काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली होती. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असून याबाबतची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी, निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार, प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली आहे, लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे. असं अतुल झेंडे यांनी सांगितलं होतं. पुढे ते असंही म्हणाले होते की, परिसरातील 3 बारचे लायसन्स रद्द झाले आहेत, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे,मद्य प्राशन करणे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे, जे आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केली आहेत, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे, अशी माहिती शहराचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली होती.