फोटो सौजन्य: Yandex
भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक तात्काळ, कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई होणार आहे.
या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, ट्रिपल सिट यांसारख्या गुन्ह्यांवर आता AI प्रणाली लक्ष ठेवणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बसवलेली स्मार्ट प्रणाली वाहनांच्या नंबर प्लेट्स ओळखून थेट दंडाची नोटीस संबंधित वाहनधारकांना पाठवणार आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की, “या नव्या तंत्रज्ञानामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये वाढेल. त्यामुळे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होईल.” हा उपक्रम नागरिकांना शिस्तबद्ध वाहतुकीकडे वळवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आला आहे.
सध्या मिरा-भाईंदर शहरात १०० हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, भविष्यात आणखी १०० कॅमेरे बसवण्याची योजना पोलीस आयुक्तालयाकडून आखण्यात आली आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी लागणारे मनुष्यबळ कमी होणार असून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढणार आहे.
हेल्मेट न घालणे: AI प्रणाली दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या प्रवाशावर लक्ष ठेवून उल्लंघन झाल्यास त्याची नोंद करते.
ट्रिपल सिट: दुचाकीवर तीन प्रवासी असतील, तर सिस्टम आपोआप तो उल्लंघन म्हणून नोंदवते.
ANPR (Automatic Number Plate Recognition): वाहनांच्या नंबर प्लेट्स अचूकपणे वाचून त्यावरील माहितीच्या आधारे थेट दंड आकारला जातो.
डिजिटल ई-चलन: कोणताही मानव हस्तक्षेप न करता चलन थेट नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचते.
या प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात, मार्च २०२५ पासून पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून पहिलं ई-चलन ७ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलं आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील सात कलमी कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.
विरुद्ध दिशेने वाहन चालवणं
अति वेगाने वाहन चालवणं
घटनांची त्वरित नोंदणी (अपघात, ट्रॅफिक जॅम, अनुशासन भंग)
या प्रणालीमुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होत असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक नियमांची शिस्त पाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे मिरा-भाईंदर आणि वसई-विरार क्षेत्र वाहतूक व्यवस्थापनात ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने ठाम पावले टाकत आहे.
उद्घाटन सोहळ्यात पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, परिमंडळ १ चे अधिकारी, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिस्त, सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ म्हणजेच – मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा स्मार्ट ट्रॅफिक उपक्रम!