फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वाहतूक कोंडीसह वाढत्या गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न असून ते सोडवण्यासाठी समंजस अशा सचिन बासरे यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणात केले. कल्याण पश्चिमेतील महाविकास आघाडी उमेदवार सचिन बासरे यांच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीचा फटका आज या पत्रकार परिषदेसाठी येत असताना आपल्याला बसला आहे. त्यामुळे सचिन बासरे यांना निवडून दिल्यास इथल्या चाकरमान्यांची ही महत्त्वाची समस्या सोडवून त्यांना नक्कीच दिलासा देतील असा विश्वास अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे, उपनेते अल्ताफ शेख, विधानसभा संघटक किशोर शुक्ला, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, दिनेश शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश बोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तर गद्दारांच्या सरकारने सत्ताबदल झाल्यानंतर आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी आणून बसवले आहेत. आणि जे लोकं त्यांच्याविरोधात बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असून सत्ताधारी इकडे दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. तसेच “जे बटेंगे तो कटेंगे” च्या घोषणा देतात ते स्वतःच्या सख्ख्या भावासोबत राहू शकत नाही. अशा लोकांनी महाराष्ट्रात येऊन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
निवडणूक आयोगाला लक्ष्य करताना त्यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने पक्षपातीपणे वागू नये, आमच्या मागे ससेमिरा लावत असताना समोरच्या उमेदवाराकडे डोळेझाक करत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. तर मनसेवर टिका करताना त्यांची नेमकी भूमिका काय आहे हेच कळत नसल्याचे सांगत कल्याण पश्चिमेतील नागरिक यंदा मतांचे विभाजन न करता सचिन बासरे यांना निवडून देतील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.
कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार निवडणूक लढवत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपच्या कपील पाटील यांना मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे शिंदेसेनेचे पारडे जड असले तरी मात्र विधानसभा निडवणुकीमध्ये पहिल्यांदाच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने येथील लढाई अत्यंत चुरशीची होणार आहे. 2009 पासून येथे मनसे, भाजप, शिवसेना असे तीन वेगवेगळ्या पक्षाचे आमदार जनतेने निवडून दिले आहेत. आता या निवडणुकीत जनता कोणत्या पक्षाला कौल देते हे कल्याणमधील राजकीय वर्चस्वाकरिता महत्वाचे ठरणार आहे.