फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल ताशांच्या गजरात आणि मोठी रॅली काढून बासरे यांनी हा आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी, नेते विजय साळवी, खासदार सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, सिनेट सदस्य ऍड. अल्पेश भोईर, दिनेश शेटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्य कल्याणकर आमच्या सोबत
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास असणारा हा कल्याणकर असून सामान्य कल्याणकर आमच्या सोबत असल्याची भावना उमेदवारी अर्ज दाखल करताना सचिन बासरे यांनी व्यक्त केली. तसेच येणाऱ्या 20 तारखेला सगळे कल्याणाकर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहून मशालीला मतदान करतील. आणि 23 तारखेला भगवा झेंडा फडकेल असा विश्वासही बासरे यांनी यावेळी व्यक्त केला.
दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
कल्याण पश्चिममध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. त्यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर विरुद्ध यांचा सामना असणार आहे. कल्याण परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याने महायुतीमध्ये या भागात शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघाच्या निवडणूकीत त्यांचेही विशेष लक्ष असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघाविषयी
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत 2008 साली कल्याण पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 मधील मतदारसंघाच्या पहिल्या निवडणूकीमध्ये या मतदारसंघावर मनसेने झेंडा रोवला होता. मनसेचे प्रकाश भोईर यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर विजय मिळवला. 2014 मधील निवडणूकीत भाजपचे नरेंद्र पवार यांनी येथून विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या विजय साळवी यांना अवघ्या 2 हजार मतांनी पराभूत केले होते. 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपचा विद्यमान आमदार असतानाही जागावाटपात शिवसेनेने मिळवला. यामुळे तत्कालिन आमदार नरेद्र पवार यांनी येथून बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी दाखल करत टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी 22 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळविला.
आता दोन्ही शिवसेना वेगळे झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची असणार आहे. नेमक्या कोणत्या शिवसेनेच्या बाजूने कल्याणकर कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.