ठाणे /स्नेहा जाधव,काकडे : जगभरातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या ृमध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.
मुंबईत करोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र, संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
देशभरात कोविडचं थैमान पुन्हा एकदा सुरु झालं. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कोविड रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे मनपा हद्दीत देखील गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले त्याचवेळी कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
याचपार्श्वभूमीवर आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच करोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते.शहरातील शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, मॉल्स आणि बाजारपेठांमध्येदेखील मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधी सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व संस्थांना निर्देश दिले आहेत की, लक्षणे असलेल्यांना उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावे, असं आवाहन केलं आहे.