मुंबई : गोरेगाव येथे झालेली गृहनिर्माण परिषद ही न भुतो न भविष्य अशी होती. सहकारी बँकेने मुंबई सारख्या शहराचा विचार करून परिषद घेतली अशी मुंबईतील एकमेव मुंबई बँक आहे. हे माझे शहर आहे, या शहरात माझाही विकासाला हातभार लागला पाहिजे. या विचाराने कार्यक्रम करणारी ही आपली बँक आहे. हे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केले आहे. तर मुंबईकरांच्या गृहनिर्माण सहकारी परिषदेतील वचनपूर्तीसाठी येत्या २० फेब्रुवारीला काळाचौकी येथे ‘धन्यवाद देवेंद्रजी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी दिली.
मुंबई बँकेच्या सभागृहात काल भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपा सहकार आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुरुवातीला आमदार आशिष शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर म्हणाले की, गोरेगावला सहकार परिषद घेतली. त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा आपण उंचावल्या होत्या. त्या परिषदेतील गर्दी आपल्यासाठी नव्हती तर ती गर्दी मुंबईच्या प्रश्नांची, अपेक्षांची होती. जेव्हा प्रश्न, विषय, अपेक्षा असतात त्यावेळी गर्दी आणायला फार त्रास होत नाही. या परिषदेत २० ठराव केले होते त्यापैकी १६ शासन निर्णय झाले. ज्यांनी हे केले, अनेक बैठका मंत्रालयात, सह्याद्रीवर घेतल्या ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे एवढे काम केल्यानंतर मुंबईकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या सहकार्यातून उतराई होण्यासाठी २० फेब्रुवारीला ‘धन्यवाद देवेंद्रजी’ हा कार्यक्रम घेत आहोत, असे दरेकर यांनी यावेळी जाहीर केले.
दरेकर पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. एकही अधिकारी अनुपस्थित नव्हता. जशी गोरेगावच्या परिषदेला मदत केली तशीच मदत या कार्यक्रमाला करण्याचे नियोजनही अधिकारी वर्ग त्यांच्या स्तरावर करत आहेत. मदत करणारे अनेक हात असले तरी खरा कार्यक्रम हा आपला आहे. आपण या कार्यक्रमाचे यजमान आहोत. कारण गोरेगावच्या कार्यक्रमातून सहकारी कार्यकर्त्याची एकजूट आणि ताकद या महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आहे. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे आवाहनही दरेकर यांनी केले. तसेच ‘धन्यवाद देवेंद्रजी’ निमित्ताने कार्यक्रम घेत आहोत हाही एक राज्यातील अभूतपूर्व यशस्वी झालेला कार्यक्रम आहे. हे तुमच्या ताकदीवर आपल्याला दाखवून द्यायचे आहे. संपूर्ण सहकार आपल्यासोबत असून कार्यकर्त्यांनी वसाहतीत जाऊन फेडरेशनची बैठक घेऊन या कार्यक्रमाची माहिती द्यावी जेणेकरून तुम्हीही त्यांच्याशी जोडले जाल. ज्यांचे एसआरए प्रकल्प रखडले असतील त्याची हमी घ्या. स्वयंपुनर्विकास आपण करून दाखवला आहे. मुंबईत १५-१६ प्रकारणांना कर्ज दिले असून त्यातल्या ७-८ इमारती उभ्या राहिल्या आहेत. आपण मुंबईकरांना दाखवून देणार आहोत आम्ही परिषद घेतली, एवढे प्रश्न सोडवले, मुंबईकरांचे अजून प्रश्न राहिलेत ते सोडविण्यासाठी मुंबई बँक, हौसिंग फेडरेशन पुढे आलेय हा विश्वास मुंबईकरांच्या मनात निर्माण करायचा असल्याचेही दरेकरांनी यावेळी म्हटले.
या प्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत भुईखेडकर, मुंबई बँकेचे संचालक प्रकाश दरेकर, जिजाबा पवार, आनंदराव गोळे, अनिल गजरे, विनोद गोडसे, नितीन बनकर यांसह सहकार आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.