मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/after-bjp-withdrew-its-nomination-sharad-pawar-gave-this-reaction-337040.html”]
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र आज भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांचे तसेच भाजपाचे आभार मानले आहेत. दरम्यान, लटके पुढे बोलताना म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी ऋणी राहिन, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली आहे. तर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे माध्यमांशी बोलताना माझ्यावर कोणाचीही अर्ज मागे घेण्यासाठी दबाव नव्हता, असं पटेलांनी म्हटलेय.