संग्रहित फोटो
चाकण/अतिश मेटे : राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. तरीही चाकण शहरात प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, महात्मा ज्योतिराव फुले भाजीपाला उपबाजार तसेच विविध किरकोळ विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. प्लॅस्टिकबंदीचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात चाकण नगरपरिषदेकडून कठोर कारवाई केली होती. अनेक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती तसेच व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याबाबत सूचना दिल्या होत्या. महात्मा जोतिराव फुले भाजीपाला उपबाजारात जनजागृती करून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही केले होते. त्यामुळे काही काळ व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळल्याचे दिसून आले होते. मात्र, कालांतराने प्रशासनाची कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा शहरात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा सुळसुळाट सुरू झाला आहे.
महात्मा जोतिराव फुले भाजीपाला उपबाजारासह किरकोळ भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, चिकन-मटण व मासे विक्रेते, मिठाई विक्रेते, किराणा माल विक्रेते तसेच फूल विक्रेत्यांकडून सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. ग्राहकांनाही सहज उपलब्ध असल्याने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत चालला आहे. याशिवाय विविध कार्यक्रम, मेजवान्या, लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक जेवणावळींमध्ये प्लॅस्टिक द्रोण, ग्लास, कप, वाट्या आणि चमच्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या सर्व प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शहरातील बाजारपेठा व रस्ते परिसरात कचऱ्याचे ढीग साचताना दिसत आहेत. चाकण मार्केटयार्ड परिसरात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबणे, पावसाळ्यात पाणी साचणे तसेच जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या या प्लॅस्टिकच्या वापरामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, सर्वच स्तरांवर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडत असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करून प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जनजागृतीची गरज
प्लॅस्टिकबंदी यशस्वी करण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून नागरिक, व्यापारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. कापडी पिशव्या, कागदी पिशव्या तसेच पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कठोर कारवाईची मागणी
चाकण शहरात पुन्हा प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर वाढल्याने चाकण नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






