संग्रहित फोटो
पुणे : शासनाने सुरू केलेल्या ज्येष्ठ नागरिक योजना एसटी विभागाला एक वरदान ठरत असून, या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांकडून मोठा फायदा घेतला जात असल्याचे दिसत आहे. केवळ पुणे विभागात याअंतर्गत २०२५ आणि जानेवारी २०२६ या तेरा महिन्यात २६ लाख ५८ हजार ७९३ जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन विभागाच्या बसमधून (एसटी) प्रवास केला असून, या योजनेतून पुणे विभागाला तब्बल १२ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी ठरली असल्याचेही दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाने महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट योजना आणली. गेल्या काही वर्षात लाल परी म्हणजेच एसटी बसची अवस्था बिकट झाली होती. परंतु, शासनाने ही योजना आणल्यानंतर राज्यभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असल्याचे दिसत आहे. पुण्यातही ते दिसत असून, पुणे एसटी विभागातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये (साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी) तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा मतदान कार्ड हे ओळखपञ दाखवून प्रवास करू शकतात. त्यानुसार, गेल्या तेरा महिन्यात पुणे विभागातून तब्बल २६ लाख ५८ हजार ज्येष्ठांनी एसटीतून प्रवास केला असल्याचे परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यातून परिवहन विभागाला तब्बल १३ कोटींच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.
जेष्ठ नागरिक योजनेतीन २०२५ मधली लाभार्थी आणि उत्पन्न
| महिना | लाभार्थी | उत्पन्न |
|---|---|---|
| जानेवारी | २,१४,७५७ | ९३,१४,०८९ |
| फेब्रुवारी | १,९५,९८९ | ९७,६०,१३९ |
| मार्च | २,०६६,१५ | ९७,५३,५५१ |
| एप्रिल | २,१०,२४४ | १,०४,८७,००३ |
| मे | २,०३,१८६ | ९८,१७,३०२ |
| जून | १,९८,२६४ | ९७,८७,०१७ |
| जुलै | २,०१४,४६ | १,०४,४४,५१८ |
| ऑगस्ट | २,०१७,७४ | ९४,८३,७८९ |
| सप्टेंबर | १,९०,४५३ | ८७,०५,३९४ |
| ऑक्टोबर | १,९७,१०७ | ९३,९१,२६१ |
| नोव्हेंबर | २,१८,२७२ | १,१३,७७,३०४ |
| डिसेंबर | २,१६,१८२ | १,०७,८१,१०७ |
| एकूण | २४,५४,२८१ | ११,९४,०२,४७४ |
जानेवारी २०२६
लाभार्थी – २,०४,५१५
उत्पन्न – १,०३,५३,२३०
ज्येष्ठ नागरिक सन्मान योजनेअंतर्गत गेल्या १३ महिन्यात २६ लाख ५८ हजार ज्येष्ठांनी एसटीतून प्रवास करून पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. सुरक्षित आणि सवलतीच्या दरात प्रवासासाठी ज्येष्ठांनी एसटीने प्रवास करावा. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग






