सौजन्य - नवराष्ट्र टीम
मोहोळ : सोलापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे उन्हाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीसाठी लागणारी पाण्याची निकड लक्षात घेता, खासदार शिंदे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती.
भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मोहोळ तालुक्यातून भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र जाते. या नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि शेती पूर्णतः नदीवर अवलंबून आहे. पाणी सुटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना तसेच पिकांना संजीवनी मिळणार आहे. यामध्ये मोहोळ सह मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वाढत्या तापमानामुळे भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे ठाक पडले होते. यामुळे उभी पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली होती, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि तातडीने पाणी सोडण्यास भाग पाडले.
”शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, ही आमची प्राथमिकता होती. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच नदीपात्रात पाणी पोहोचेल.” —खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर.
उजनीतून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे मोहोळसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः बागायतदार शेतकरी आणि पशुपालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासनाकडे आता हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.
”पाणी सोडण्याचा निर्णय अधिकृत प्रक्रियेतून झाला आहे. खासदार प्रणिती शिंदेंनी जनहितासाठी पाठपुरावा केला, तर दुसरीकडे स्वतःच्या कारखान्याचा ऊस वाचवण्यासाठी धडपडणारे आता फुकटचे श्रेय लाटत आहेत. हा यातील मोठा फरक आहे.” — सुलेमान तांबोळी (अध्यक्ष, काँग्रेस (आय) मोहोळ तालुका)






