सौजन्य - नवराष्ट्र टीम
वाढत्या तापमानामुळे स्थानिक मजूर शेतात काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना बाहेरील जिल्ह्यांतून मजूर आणावे लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना दारोदार फिरावे लागत असून, इतर तालुक्यांमध्येही जावे लागत आहे. मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा वेळेत काढला गेला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी चिंता कांदा उत्पादक शेतकरी माजी सरपंच राजूशेठ ढोबळे व अनिल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी धास्तावले
दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीला वेग दिला आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत.
बाजारभावाअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
बाजारपेठेत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मजुरीचे पैसे कसे द्यायचे आणि काढणीचा खर्च कसा भागवायचा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मागील हंगामातही अपेक्षित भाव न मिळाल्याने काही शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची वेळ आली होती. सध्या शेतकरी भविष्यात बाजारभाव सुधारेल या आशेने कांदा काढणी करून साठवणुकीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मजूर टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच गडद होत असल्याचे चित्र आहे.






