आता शिवभोजनही अडचणीत (File Photo : Anandacha Shidha)
पुणे : राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य सरकारची योजनादूत ही योजनादेखील थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून आनंदाचा शिधा मिळणार का? असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. मात्र, आंनदाच्या शिधाची पिशवी वगळून शिधामधील संपूर्ण रेशन कार्ड धारकांना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.
दोन महिन्यात ५ लाख २७ हजार ३४२ लाभार्थ्यांपैकी ३ लाख १७ हजार ७४३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. तर उवर्रीत २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना किट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीत रेशनकार्ड धारकांना शासनाकडून केवळ शंभर रूपयांत आनंदाचा शिधा दिला जाते. यामध्ये १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो, रवा व १ किलो हरभरा दाळीचा समावेश आहे.
गणेश चतुर्थी निमित्त नागरिकांना या आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात गणेशोत्सव झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झाला. त्यामुळे या उत्सवाचा शिधा वाटप सुरू असतानाच मंगळवारी विधानसभेची आचारसंहिता लागू झाली.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जातो. त्यामुळे विधानससभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने हा शिधा वाटप होईल का? असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. परंतु, यावर पर्याय काढत त्या राजकीय पिशवीविनाच कार्डधारकांना शिधामधील साहित्य देण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.