संग्रहित फोटो
कोल्हापूर : फोन करून मित्रांना इन्स्टावर लाइव्ह येण्याचे सांगून शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह रविवारी (दि. २२) सकाळी अकराच्या सुमारास सापडला आहे. त्याने शनिवारी दुपारी पुलावरून उडी मारली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधून बाहेर काढला. हर्षवर्धन विजय सुतार (वय २१, मूळ रा. वरणगे पाडळी, ता. करवीर, सध्या रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
हर्षवर्धन सुतार हा शहरातील एका महाविद्यालयात ‘बीबीए’चे शिक्षण घेत होता. आईचे निधन झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तो राजोपाध्येनगर येथे मामाकडे राहत होता. शनिवारी दुपारी तो त्याच्या दुचाकीवरून शिवाजी पुलावर पोहोचला. कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना फोन करून त्याने इन्स्टावर लाइव्ह यायला सांगितले. त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचे सांगत त्याने पुलावरून नदीत उडी घेतली होती. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांकडून हर्षवर्धनचा शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवली होती. रविवारी सकाळी दहापासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. पाणबुड्यांच्या मदतीने शोध सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास पुलाजवळ नदीत मध्यभागी त्याचा मृतदेह सापडला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
नैराश्यातून आत्महत्या
हर्षवर्धनचे वडील, मामा, मामी, आजी यांच्यासह मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळपासूनच शिवाजी पुलावर पोहोचले होते. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. कौटुंबिक वाद किंवा नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
पुण्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पती तसेच सासरच्या जाचाला कंटाळून शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोंढवा आणि विमानतळ परिसरात या घटना घडल्या असून, याप्रकरणी पती व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पहिल्या घटनेत नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नयना यांचा प्रकाश याच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रकाशने नयना यांचा छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्याने मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून नयना यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.
दुसरी घटना कोंढवा भागात घडली असून, पतीच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी राहुल माने (वय ३६, रा. कासट काॅलनी, साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती राहुल याच्यासह नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल केला. याबाबत अश्विनी यांच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अ्श्विनीचा पती राहुल तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिला त्याने मारहाण केली होती. छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.