आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर हातोडा पडणार
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सायकल ट्रॅकबाबत महायुती सरकारने मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. बांद्रा-कुर्ला संकुल (BKC)परिसरात उभारण्यात आलेल्या ९.९० किमी लांबीचा सायकल ट्रॅक लवकरच हटवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यासाठी २५ कोटी रुपये खर्च करून कंत्राटदार नेमणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या सायकल ट्रॅकमुळे या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जातआहे. या ट्रॅकच्या जागी नवीन मार्गिका तयार करून या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हेतू असल्याचे MMRDA ने स्पष्ट केले आहे. सायन पूल सध्या बंद असल्यामुळे BKC परिसरात एकेरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे तोडगा म्हणून सायकल ट्रॅक हटवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, सायकल ट्रॅक हटवल्यानंतर सध्या असलेल्या दोन मार्गिकांमध्ये एक नवीन मार्गिका तयार होईल. यामुळे रस्त्याच्या एकूण वाहतूक क्षमतेत ५०% ची वाढ होईल. प्रत्येक मार्गिकेमध्ये ६०० ते ९०० वाहनांची वाढ होण्याची शक्यता असल्याचेही MMRDAने म्हटले आहे.
सायकल ट्रॅक उभारणीसाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदाच्या काळात पुढाकार घेतला होता. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने उभारलेला हा ट्रॅक आता हटवण्यासाठी देखील कोट्यवधींचा खर्च होणार असल्याने विरोधकांकडून टीकेची शक्यता निर्माण झाली आहे.
सायकल ट्रॅक हटवल्यानंतर सध्याच्या दोन मार्गिकांमध्ये तिसऱ्या मार्गिकेचा समावेश केला जाणार आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणात सुमारे ५० टक्क्यांची वाढ होणार असून, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. गर्दीच्या वेळेत प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. तसेच सिग्नल किंवा अरुंद ठिकाणी होणारी प्रतीक्षा १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत घटेल. परिणामी, एकूण वाहतुकीचा वेग वाढेल आणि नागरिकांचा वेळही वाचेल.
वाहतूक सुरळीत झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ३० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज MMRDAने व्यक्त केला आहे. बांद्रा-कुर्ला संकुलातील (BKC) अंतर्गत वाहतूक सुधारण्यासाठी रस्ते रुंद करण्यासह एकेरी वाहतुकीची योजना राबवण्यात येणार आहे. MMRDAच्या बैठकीत या पार्श्वभूमीवर सायकल ट्रॅक हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सध्याचा दोन मार्गिकांचा रस्ता तीन मार्गिकांचा होणार आहे आणि प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६०० ते ९०० वाहनांनी वाढेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.