पुणे : शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काल दोन्ही गटाच्या झालेल्या दसरा मेळाव्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खरी शिवसेना कोणाची हे शिंदेच्या दसरा मेळाव्यातील गर्दीने दाखवून दिलं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, नागपुरात असल्याने मी दोन्ही भाषणं ऐकलेली नाहीत. पण मी भाषणांचा थोडा थोडा सारांश ऐकला आहे. मी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणार नाही. याचे कारण म्हणजे शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणात शिमगा सोडून काही नसते त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असे त्यांनी म्हंटले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची क्षमता ही शिवाजी पार्क मैदानाच्या दुप्पट आहे. एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणाची आहे. हे दाखवून दिले, असे फडणवीस म्हणाले. विधानसभा, मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर प्रश्न विचारले असता, विधानसभेवर भगवा फडकणार असून हा भगवा भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना युतीचा फडकणार असल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजपशिवाय स्क्रिप्टशिवाय भाषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, ‘उद्धव ठाकरे यांनी आता भाषण लिहून देण्यासाठी नवीन माणसं नेमावीत’ असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांची तीच भाषणे सारखी ऐकून आम्हाला कंटाळा आला असल्याचे फडणवीसांनी म्हटले. शिवसेनेचा मूळ विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा विचार स्वीकारल्याने अनेकांनी त्यांची साथ सोडली असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत म्हटले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्यावर भर दिला. आम्ही काय केले आहे, भविष्यात काय करणार आहोत, याबाबत त्यांनी भाषणात स्पष्टता ठेवली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे पक्षप्रमुखांचे भाषण करत होते’, असेही फडणवीस यांनी म्हटले.