चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आंबेडकरी संघटनांकडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 133 वा जयंती महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. तालुक्यातील तरुणांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्रित उद्या दि. 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता शहरातून भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विविध देखाव्यांसह हजारो भीम अनुयायी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य या रॅलीची जोरदार तयारी करीत आहेत. गावोगावी बौध्दजन शाखांमध्ये जात ते रॅलीबाबत माहिती देत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे ५ ते ६ हजार भीम अनुयायी या रॅलीत सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून महामार्गावरुन एमएसईबी कार्यालय तेथून भोगाळे, बाजारपेठमार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे देखावे पाहायला मिळणार आहेत.
भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम कदम, सरचिटणीस प्रफुल मोहिते, निरीक्षक आकाश कांबळे, खजिनदार अजय पवार, सल्लागार अरुण मोहिते, संघटक आशिष कांबळे, संदेशवाहक संकेत मोहिते, सहसचिव करण कांबळे, सदस्य प्रसन्न मोहिते, पत्रकार शैलेश जाधव, असित गमरे, अर्जुन कांबळे आदी रॅलीचे नियोजन करीत आहेत.