कोयना धरणात 91.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; वीजनिर्मितीसाठी ठरेल फायद्याचा (फोटो - सोशल मीडिया)
पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात १ जूननंतर सध्याच्या स्थितीत ७ महिन्यानंतरही तब्बल ९१.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे सिंचनासह वीजनिर्मितीचा प्रश्नही मिटला आहे. यावर्षीच्या पाऊसकाळात कोयना धरणात तब्बल १८३.५ टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली.
१ जून ते ३१ मे हे कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तांत्रिक वर्ष आहे. कृष्णा पाणी वाटप लावादानुसार ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी राखीव ठेवले जाते. तर उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. यावर्षी पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पर्जन्यकाळात धरणात तब्बल १८३.५ टीएमसी पाण्याची आवक झाली. आजमितीस धरणात ७ महिन्यांनंतरही ९१.४२ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तांत्रिक वर्ष सुरू झाल्यापासून १ जूननंतर ७ महिन्यांपर्यंत धरणातून पश्चिम वीजनिर्मितीसाठी २२.४७, सिंचनासाठी ७.७८, पूरकाळातील १४.५३ टीएमसी, अशा एकूण ४४.३८ टीएमसी पाण्याचा वीज निर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला तर ६४.६७ टीएमसी पाणी विनावापर सोडून देण्यात आले. ५.२७ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
हेदेखील वाचा : BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सोय कोयना धरणामुळे होते. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते. धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहता भविष्यातील सिंचनासह वीजनिर्मितीचा प्रश्न मिटला आहे.
सिंचनासाठी आतापर्यंत ७.३८ टीएमसी पाण्याचा वापर
सिंचनासाठी आतापर्यंत ७.३८ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. तर कृष्णा लवादानुसार ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापैकी २२.४७ टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने पुढील पाच महिन्यात ४५.१७ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी अजून आरक्षित आहे. त्यामुळे पुढील तांत्रिक वर्षापर्यंत सध्याचा धरणातील शिल्लक पाणीसाठा दिलासादायक आहे.
हेदेखील वाचा : SATARA : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य






