संग्रहित फोटो
पंढरपूर : अलीकडील बदलत्या हवामानामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री गारवा यामुळे सर्दी, ताप, खोकला व अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. परिणामी, उपजिल्हा रुग्णालयात दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १०० वरून १५० पर्यंत पोहोचली आहे.
सध्याच्या हवामानात विषाणूजन्य आजार झपाट्याने पसरतात. हे आजार श्वसनसंस्थेवर व पचनसंस्थेवर परिणाम करतात. वाढत्या उष्णतेने उष्माघाताची शक्यता असून मळमळ, उलटी, डोकेदुखी, त्वचा गरम होणे, थकवा, चक्कर आणि डिहायड्रेशन ही लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उष्माघाताचा धोका
उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने उष्माघातासारख्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन आराेग्य तज्ज्ञांनी केले आहे.
लक्षणे काेणती?
मळमळ, उलटी, थकवा येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
सध्याचे बदललेले वातावरण नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरत आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने उपचार घ्यावेत. विषम वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वातावरण बदलामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. स्वच्छ आणि भरपूर पाणी प्यावे.
-डॉ. आनंद गवळी, कासेगाव
काय काळजी घ्याल?
बाहेरचे खाणे, विशेषतः हॉटेल्स, किंवा फूड स्टॉल्सवर तयार केलेले पदार्थ स्वच्छतेच्या बाबतीत अनिश्चित असू शकतात. म्हणून बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. दिवसभरातील उष्णतेमुळे मुलांचे शरीर डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे मुलांना उन्हात फिरायला पाठवू नये. मुलांचा आहार पोषणतत्त्वांनी समृद्ध असावा. प्रोटीन, व्हिटॅमिन सी, आयर्न आणि फायबर असलेले पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा.