शाळेच्या ओळखपत्रसाठी लागणारा फोटो काढण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरीराला फोटोग्राफरने स्पर्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटोग्राफरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नदाफला ताब्यात घेतले असून भादंवि ३५४ , ३५४ (ब) व पोक्सो ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फौजदार अजित मोरे तपास करत आहेत.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. ही अल्पवयीन विद्यार्थिनी सकाळी आठ वाजता फोटो स्टुडिओत गेली होती. त्यावेळी तेथे स्टुडिओचा मालक लायकअली अल्लीसाहेब नदाफ हा एकटाच होता. कपडे काढून फोटो घे, असे म्हणत त्याने मुलीच्या अंगावरील कपडे काढले. मुलीने याला विरोध केला तरी त्याने हा प्रकार केलाच. तिच्या शरीराला स्पर्श केला. हा प्रकार घरात कुणालाही सांगू नकोस, अन्यथा तुला सोडणार नाही अशी धमकीही त्याने मुलीला दिली. मात्र, मुलीने याबाबत घरी माहिती दिली.
नंतर विनवणी करू लागला
घरी आल्यानंतर मुलीने या प्रकाराची तिच्या आईला माहिती दिली. आईने स्टुडिओत जाऊन नदाफ याला जाब विचारला. त्यानंतर तो विनवणी करू लागला. माझ्याकडून चूक झाली, माफ करा, यापुढे असे करणार नाही, असे त्याने पीडित मुलीच्या आईला सांगितले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर नागरिक स्टुडिओजवळ जमा झाले. त्यानंतर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली.