संग्रहित फोटो
जळगाव : जळगाव-बांबुड या धावत्या एसटी बसचा (ST Bus) रॉड तुटल्याने बस अपघात झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, पुढील प्रवासासाठी पर्यायी बस मागणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी बसमधील प्रवाशांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांब्रुड गावासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव डेपोची बस निघाली होती. शिरसोली गावाजवळ असताना पुढील चाकाजवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, चालक हेमंत पाटील यांनी समयसूचकता दाखवत बस कशी तरी रस्त्याच्या बाजूला लावण्यास यश मिळविले. दुसरी बस मिळत नसल्याने बसमधील काही प्रवाशांनी एसटी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला.
प्रवाशी थेट आपल्याशी संपर्क करत असल्याने मनोज तिवारी नावाच्या वाहतूक अधिकाऱ्याने रागाच्या भरात चालक हेमंत पाटील यांना शिवीगाळ केल्याचा आणि प्रवाशांनाही अरेरावीची भाषा केल्याचा आरोप प्रवासी महिलांनी केला आहे. या घटनेनंतर मंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, त्यातही काही अंतर गेल्यावर बिघाड झाला. एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी याकडे व अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.