नेहमीच्या बाजारपेठेपेक्षा आठवडा बाजारात महागाई अधिक झाल्याने घराचं बजेट सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत होत आहे. राजापूर तालुक्यासह जिल्हाभरात विविध गावात काही वर्षांपासून आठवडा बाजार सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये त्या त्या ग्रामपंचायतींचा व नगर परिषदांचा पुढाकार अधिक आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दररोज चढउतार होत आहेत. अशावेळी आठवडा बाजारात उपलब्ध होणाऱ्या अनेक वस्तू या स्थानिक बाजारापेक्षा स्वस्त मिळतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र आता काही भागात हे चित्र उलट दिसत आहे.
स्थानिक बाजारात मिळणाऱ्या वस्तू आता आठवडा बाजारात चढ्या दराने विकल्या जात आहेत. राजापूर तालुक्यात विविध ठिकाणी आठवडा बाजार भरतो. मात्र तेथे काहीवेळा स्थानिक बाजारापेक्षा वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे महिला वर्गाचे म्हणणे आहे. स्थानिक बाजारात २० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा अनेक ठिकाणच्या आठवडा बाजारात २५ रुपये किलो दराने विकला जात होता. तर इतर वस्तू ही महाग विकल्या जात असल्याने आठवडा बाजार महाग ठरत आहे.
राजापूरच्या आठवडाबाजाराला आता स्वैर स्वरुप आले असुन फक्त औषधे सोडुन आठवडा बाजारात सर्वच वस्तू मिळू लागल्याने व यावर नगर परिषद प्रशासनाचाही कोणताच अंकुश नसल्याने स्थानिक बाजारातील व्यापारी मेटाकुटीला आला आहे. मुळात नाशवंत मालाच्या विक्रीसाठी आठवडाबाजाराची संकल्पना अस्तित्वात आलेली असताना आता मात्र आठवडाबाजारात चप्पल, कपडे, भांडी यासह सर्व वस्तु मिळत असल्याने स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
कचऱ्याची डोकेदुखी, एका दिवसाला सिंगल युज प्लास्टिकचा सुमारे एक टन कचरा –
स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांकडून नगर परिषद वर्षाकाठी हजारो रुपयांचा कर गोळा करत असली तरी कायम नगरपरिषद प्रशासन आठावडा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी पायघड्या घालत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेचाही बोजवारा या आठवडा बाजारामुळे उडाला असुन गुरुवारच्या आठवडा बाजारादिवशी सिंगल युज प्लास्टिकचा सुमारे एक टन कचरा राजापूर नगरपरिषदेला उचलावा लागत आहे. तर इतर कचरा ज्यामध्ये खराब भाजीपाला व त्याचे अवशेष, कांदा बटाट्याचा कचरा हे व्यापारी आपल्या गाडीतुन नेऊन शहराबाहेर टाकत असल्याने तेथील नागरिकांना या कचऱ्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
आठवडा बाजार म्हणजे स्वस्त अशी संकल्पना सर्वसामान्य जनतेची असताना आता मात्र हे आठवडा बाजार महागडे ठरु लागले आहेत. या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे वजनमापांचेही मुल्यांकन होत नसल्याने आता सर्व सामान्य जनतेची फसवणुकही मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे. नगर परिषद फक्त एक दिवसाला मिळणारा महसुल गोळा करण्यात धन्यता मानत असुन सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या फसवणुकीला जबाबदार कोण? हा प्रश्न कायम आहे.