पंचवटी : नाशिक शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, एकीकडे चोरट्यांना पकडण्यास शहर पोलीस दलाला अपयश येत (Nashik Police) आहे. तर दुसरीकडे चोरट्यांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाला आपले लक्ष बनवले. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टीलच्या साखळ्या लंपास करत एकप्रकारे थेट पोलीस प्रशासनाला आव्हान दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गडकरी चौकातील दक्षता बिल्डिंगमधील विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला बसविण्यात आलेल्या स्टीलच्या तीन हजार रुपये किंमतीच्या साखळ्या चोरटयांनी लंपास केल्या आहे. या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षकांचेच कार्यालय सुरक्षित नसेल त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा वेशीला टांगली गेली असल्याची टीका नागरिकांकडून केला जात आहे. या चोरीच्या घटनेबाबत पोलीस कर्मचारी यश संपत पवार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.