पुणे : अखेर भाजपने आजारी खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उतरविले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ऑक्सिजन सिलिंडरसह व्हिलचेअरवरून बापट यांना आणले गेले. यावर विरोधकांकडून टीका केली गेली. सोशल मीडियावरही भाजपच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बापट हे प्रकृती ठीक नसल्याने या पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहिले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने भाजपकडून ही जागा कायम राखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करण्यावर भर दिला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीची धुरा स्वत:कडेच घेतल्याचे दिसत आहे. पुण्याच्या राजकारणात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रवेश झाल्यानंतर बापट यांचे पक्षांतर्गत राजकारणातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
‘कसब्याची ताकद; गिरीश बापट’
‘कसब्याची ताकद; गिरीश बापट’ ही घोषणा भाजपमधील बापट समर्थकांकडून काही पक्षातंर्गत कार्यक्रम, विविध आंदोलनातून ऐकायला मिळत होती. सध्या सुरु असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बापट हे प्रकृती ठीक नसल्याने लांब होते. त्याचा फटका हा महायुतीचे उमेदवार रासने यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हा धोका टाळण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आजारी असणारे खासदार बापट यांना व्हिल चेअरवरून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आणले.
ही निवडणूक चुरशीची नाही , विजय आपलाच
या मेळाव्यात बापट यांनी दोन मिनिटांचे मनोगत मांडले. तत्पूर्वी त्यांचे एक पत्र वाचून दाखविण्यात आले होते. बापट म्हणाले, ‘आपला पक्ष हा अनेक निवडणुका लढला, हरला पण पक्ष संघटन हे मजबूत राहिले आहे. ही पोटनिवडणूक चुरशीची नाही, विजय आपलाच होणार आहे. हेमंत हा चांगला उमेदवार आहे. कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन प्रचार करावा. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.