पुणे पर्यटन महोत्सव (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुण्यात होणार पर्यटन महोत्सव
लोकल टू ग्लोबल सहलींचे अनेक पर्याय खुले
सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य
पुणे: महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजिला केला जाणारा ‘पुणे पर्यटन महोत्सव’ अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल यंदा १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन पुणे येथे होणार आहे. तीनही दिवस हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे, अशी माहिती भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी, खजिनदार हेमंत जानी, संचालक संतोष माने, सजेश पिल्ले, आशिष हिंगमिरे, अमित कुलकर्णी, चंदन पठारे आदी उपस्थित होते.
प्रवीण घोरपडे म्हणाले, पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि.१६ रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध गायिका डॉ.राधा मंगेशकर व पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात नामांकित ७० पेक्षा अधिक पर्यटन कंपन्या आपले सहलींचे पर्याय सादर करणार आहेत. त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट, काश्मीर टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम, मानसरोवर यात्रा यावर चर्चासत्रे होणार आहेत. ‘एकटीचा सफरनामा’ हे डॉ. राधा मंगेशकर यांचे अनुभवकथन ऐकता येणार आहे.
या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन संचालनालय, पर्यटन मंत्रालय, पुणे विमनातळ प्रशासन, पुणे रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो प्रशासन, पीएमपीएल प्रशासन, ट्रॅव्हेल एजन्सी असोसिएशन्स, हॉटेल रेस्टोरंट असोसिएशन्स, रिसॉर्ट्स असोसिएशन, कृषी पर्यटन असोसिएशन, लोकल टूर गाईड्स, इव्हेंट मॅनेजमेंट आदी विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित केलेले आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठीच्या या महोत्सवात विविध मान्यवर चर्चा करणार आहेत.
Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…
यासह देशविदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच छताखाली असणार आहेत. कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंतच्या असंख्य सहलींचे नियोजन इथे करून घेता येणार आहे. तसेच महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती मिळणार आहेत. महोत्सवात रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, अनेक पर्यटन कंपन्यांकडून विविध योजना सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पुणेकर व परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवीण घोरपडे यांनी केले.






