दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची झुंबड
दीपावलीच्या सुट्टीचा हंगाम सुरू होताच कोकणात पर्यटकांचा ओघ अभूतपूर्व वाढला आहे. मुंबई व इतर शहरांतून सुट्टीसाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांमुळे मुंबई-गोवा महामार्ग अक्षरशः वाहनांच्या रांगांनी गजबजून गेला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील माणगाव–इंदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अशीच स्थिती निर्माण झाली असून, महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवास अधिक कष्टदायक ठरत आहे.
वाहतूक पोलिसांकडून सतत प्रयत्न होत असले तरीही वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे वाहतूक नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. विशेषतः माणगाव–कोलाड भागात कोंडीचा प्रश्न गंभीर स्वरूपात कायम आहे. पर्यटक मात्र या अडचणींवर मात करत मोठ्या उत्साहाने कोकणात दाखल होत आहेत.
पर्यटकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे — रत्नागिरी, दापोली, गणपतीपुळे, आंजर्ले आदी ठिकाणी गर्दीचे वातावरण दिसून येत आहे. त्याचबरोबर कोकणातील ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठीही पर्यटकांची मोठी आवड दिसत आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. बंदर परिसर जत्रेसारखा गजबजून गेला असून, ताज्या मासळीच्या खरेदी-विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मच्छी विक्रेत्या महिलांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत आहे.
हर्णे बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र असून येथील चिमणी बाजार पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, बेबी म्हाकुळ आणि बग्गा यांसारख्या जातींना प्रचंड मागणी आहे. मासळी लिलावात पर्यटक स्वतः सहभागी होऊन ‘सीफूड मार्केट’चा अनोखा अनुभव घेत आहेत.
दिवाळी सुट्टीदरम्यान दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ‘झिंगा फ्राय’, ‘पापलेट थाळी’, ‘कोळंबी बिर्याणी’, ‘खेकड्याचा रस्सा’ अशा कोकणी डिशेसचा स्वाद घेण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत. काही पर्यटक बंदरातून ताजी मासळी विकत घेऊन थेट रिसॉर्टमध्ये ती तयार करून खात असल्याचेही दिसते. ““दापोलीला आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही, असं होत नाही” असे पर्यटक आवर्जून सांगतात.
कोकणात वाढलेल्या गर्दीमुळे व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वाढते दर यामुळे पर्यटकांना काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागत आहे.






