मोर नदी पुलावर अपघात होऊन केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला (फोटो - सोशल मीडिया)
Accident News Update: फैजपूर : चार महिन्याच्या अपघात मालिकेच्या विश्रांतीनंतर आमोदा मोर नदी पुलाजवळ पुन्हा केळी मजूर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला आहे. या अपघातामध्ये २५ मजूर जखमी झाले असून हा अपघात रविवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला. तर या अपघातस्थळी उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना एका ट्रॅव्हलने उडवले. त्यात तीन जण जखमी झाले. या अपघातांमुळे जुलै महिन्यातील अपघाताच्या मालिकेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
७ जुलै रोजी मोर नदीच्या पुलाचा कठडा तोडून प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी सरळ मोर नदी पात्रात कोसळली होती.
रविवारी सकाळी पाऊस सुरू असताना सावदा येथून जामनेर येथे केळी कापणीसाठी ३० ते ४० मजूर घेऊन जाणारी आयशर ट्रक क्रमांक एम एच ४३ वाय ५०७४ ही आमोदा मोर नदीच्या अलीकडे वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. त्यात सुमारे २५ पुरुष, महिला मजूर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने फैजपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघातातील जखमींवर डॉ. शैलेंद्र खाचणे यांनी तातडीने उपचार केले. यावेळी रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती तर तत्काळ पोलिसांनी सुद्धा सहकार्य करून आमोदा रस्त्यावरील झालेली वाहतूक कोंडी दूर केली.
दुचाकीस्वार जखमी
दरम्यान अपघातस्थळी उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना सुद्धा समोरून येणाऱ्या केदार ट्रॅव्हलच्या प्रवासी बसने उडवले. त्यात युगल पाटील आमोदा, वासुदेव फेगडे बामणोद, ईश्वर बडगे सावदा हे जखमी झाले तर त्यांच्या मोटारसायकली ट्रॅव्हलच्या खाली आल्याने त्यांचे मोठ्या नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अपघातात या जखमी मजुरांचा समावेश
जखमी झालेल्या केळी मजुरांची नावे अशी, सलीम तडवी हिगोंणा, हुसेन तडवी सावदा, संजय पाटील रोझोदा, फिरोज तडवी सावखेडा, पवन मेढे रोझोदा, फकीरा तडवी खिरोदा, राजू तडवी रझोदा, साहिल तडवी निंभोरा, हसन तडवी हिंगोणा, आसिफ पिंजारी हिगोणा, भास्कर मेढे रोझोदा, शाबीद तडवी हिंगोणा, साबीर तडवी हिंगोणा, सुरेश आटकाडे, संजय अटकाडे रझोदा, चंद्रकांत तायडे रझोदा, आशा पाटील रझोदा, देवराज लहासे भोकरी, अमित तडवी हिंगोणा, सरला तायडे रझोदा, पिंटू तायडे गाते, महिंद्र तायडे कोचुर, सलीम तडवी कळमोदा, असे आहेत.
एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी
अमळनेर तालुक्यातील मारवड रस्त्यावर एसटी आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १ रोजी घडली आहे. सकाळी १०:४५ वाजता गयासोद्दीन बद्रोद्दीन मुजावर (वय ६८) हे हिरो स्प्लेंडर दुचाकीने अमळनेरकडून धारकडे जात असताना पिंपऱ्या नाल्याच्या अलीकडे समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल १४३०) वरील चालकाने भरधाव वेगाने समोरून दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गयासोद्दीन मुजावर याच्या डोक्याला, हाताला, पायाला व छातीला जबर दुखापत झाली. मागून येणारे त्याचे आतेभाऊ व इतर प्रवाशांनी त्याला अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अब्दुल अलीम अब्दुल हकीम मुजावर याने दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक बापू भगवान ठाकूर याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करत आहेत.






