पुलाचे कठडे तोडून अवजड ट्रक लटकले (File Photo)
आष्टी : अवजड साहित्य घेऊन जाणारा ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. आष्टी ते गडचिरोली या ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा पुलाचे कठडे तोडून अर्धवट स्थितीत ट्रक लटकला. ही घटना शनिवारी (दि.९) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुलाचे कठडे तोडून ट्रक अर्धवट लटकलेल्या स्थितीत आल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल ५ तास ठप्प होती. त्यामुळे रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी वाहतूक ठप्प झाल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. आष्टी येथून गडचिरोली दिशेने अवजड साहित्य घेऊन ट्रक निघाले होते. दरम्यान, अनखोडा गावालगत असलेल्या नदी पुलावर वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाचे लोखंडी कठडे तोडून अर्धवट स्थितीत अडकल्या गेले.
तत्काळ ट्रकचालकाने वाहनातून स्वतःची सुटका करून घेतली. मुख्य मार्गावरच ट्रक अडकून असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
दरम्यान, ट्रकमधील लोखंडी साहित्य दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यासह तसेच ट्रकबाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अखेर ५ तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सायंकाळी साडेपाच वाजता ट्रक रस्त्यावरून हटवण्यात आला. यादरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ऐन सणासुदीच्या दिवशी ठप्प होती.
कलोते गावात दुचाकीचा अपघात
दुसऱ्या एका घटनेत, मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील कलोते गावच्या हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना दुचाकी झाडावर आदळली, यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.