सोलापूर: आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा धसका वाढतच चालला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुंढे यांनी आरोग्य सेवकांना प्रतिनियुक्ती देता येणार नाही, असे आदेश जारी करताच आरोग्य विभागाची पाचावर धारण बसली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत उडालेल्या गडबडीत काही कर्मचार्यांची नावे गायब झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील आरोग्य अधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी एकाही आरोग्य सेवकाला परस्पर प्रतिनियुक्ती किंवा नियुक्तीचे ठिकाण सोडून इतर काम देउ नये असे आदेश दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी या आदेशान्वये प्रतिनियुक्तीवर असलेल्या 13 कर्मचार्यांची यादी जाहीर केली. या कर्मचार्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. पण आरोग्य विभागातील प्रतिनियुक्तीला असलेले आणखी काही कर्मचारी यादीतून गायब असल्याचे दिसून आले आहे. गायब नावाची यादी आयुक्त मुंढे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
सीईओच्या मर्जीतील कर्मचारी
प्रतिनियुक्तीच्या यादीतून गायब असलेले आरोग्य सेवक सीईओ दिलीप स्वामी यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांची नावे वगळण्यात आल्याची झेडपीत चर्चा आहे. विशेष म्हणजे आरोग्य सेवक आयटीसेल चालवितात हा कौतुकाचा विषय आहे. आयुक्त मुंढे यांच्याकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते याकडे कर्मचारी संघटनांचे लक्ष लागले आहे.
आमदारांनी केली होती तक्रार
जिल्हा परिषदेच्या आयटीसेलमध्ये तिसरा डोळा म्हणून कामकाज करणार्या आरोग्य सेवकांची सीईओ दिलीप स्वामी यांनी मर्जी राखल्याची चर्चा होत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी या कर्मचार्यांबाबत तक्रार केली होती. आरोग्य सेवकांना मूळ ठिकाणी पाठवून संगणक पदवीधर कर्मचारी नियुक्त करावेत अशी सूचना केली होती. पण आमदाराच्या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आता आयुक्त मुंढे यांचे अस्त्रही निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कर्मचार्यांत रंगली आहे.