मुंबई: महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात सध्या ट्विटर वॉर (Twitter War) सुरु आहे. मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी काल राज ठाकरेंना टोला लगावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. त्याला आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये राज ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर्स लावले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा टोला लगावला होता. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
“जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवू. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाची स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात. जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थावर पाठिंबा मागण्यासाठी आले होते”, असा टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही खोचक ट्वीट केलं होतं.
खोपकर काय म्हणाले?
अमेय खोपकरांनी ट्विट केलंय की,“जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”.
जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं हे सगळ्यांनाच आठवतच असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही.@Awhadspeaks
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 14, 2023
दरम्यान, अमेय खोपकरांच्या या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा खोचक ट्वीट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून दिलं आहे.
माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे … हे कोण बोलले होते हे सगळयांना आठवत असेलच.. पण त्याला मी दिलेले उत्तर पण लोकांना आठवत आणि गदगदुन हसतात…माझा चेहरा नागाच्या फण्या सारखा आहे मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागा सारखा आहे सांगू का ..बघा अर्ष्यात…जश्यास तसे उत्तर कुणालाही… https://t.co/ON7SHnl0Nz
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2023
दरम्यान, राज्यात एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जाहिरातीचा वाद चालू असताना दुसरीकडे आव्हाड आणि मनसेमध्ये ट्विटयुद्ध सुुरू आहे.