शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान (photo Credit- X)
वैजापूर : भरदुपारी झालेल्या भीषण अग्नितांडवात सुनंदा बाबासाहेब लबडे या महिला शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीने एका कष्टकरी कुटुंबाचे वर्षभराचे स्वप्न अवघ्या काही तासांतच धुळीस मिळाले आहे. कापूसवाडगाव शिवारात ही घटना घडली.
कापूसवाडगाव येथील रहिवासी सुनंदा बाबासाहेब लबडे यांची गट क्रमांक १९७ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी अत्यंत कष्टाने ४ एकर ऊसाची लागवड केली होती. ऊसाची जोमदार वाढ झाली होती आणि लवकरच हा ऊस साखर कारखान्याला गाळपासाठी जाणार होता. ही घटना केवळ नैसर्गिक नसून महावितरणच्या कारभाराचा हा परिणाम असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असतात, ज्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते.
अशा तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. आता या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला शासकीय मदत आणि महावितरणकडून भरपाई मिळावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.
आधीच शेती व्यवसाय तोट्यात असताना अशा घटनांमुळे शेतकरी पूर्णपणे खचला जात असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यातून निघालेल्या ठिणग्या खाली असलेल्या वाळलेल्या पालापाचोळ्यावर पडल्या आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीचे लोळ ऊसाच्या फडात
दुपारी उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याचा वेग असल्याने आगीचे लोळ ऊसाच्या फडात वेगाने पसरू लागले. शेतातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा करत घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने पाण्याचे टँकर आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शेतकऱ्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि प्रसंगावधानामुळे ४ एकरपैकी २ एकर ऊस वाचवण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत २ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता.
हेदेखील वाचा : सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुचाकीच पेटवली; दुकानाचेही झाले नुकसान






