सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुचाकीच पेटवली; दुकानाचेही झाले नुकसान (File Photo : Fire)
छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्री सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने दुसऱ्या दिवशी मध्यरात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी पेटवून दिली. या आगीमुळे दुकानाचा बोर्ड आणि दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना १२ जानेवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात घडली.
कार्तिक घायाळ (रा. सातारा परिसर) असे दुचाकी पेटविणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात संजय केरोबा नवगिरे (वय ४६, रा. संतोष नगर, अहिल्याबाई होळकर चौक, सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी मोंढा नाका येथील प्रभाश्री हॉस्पिटलमध्ये ओटी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरातच आई डेली नि नावाचे किराणा दुकान असून, ते पत्नी व मुलगा चालवतो.
११ जानेवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास परिसरातील राहणारा कार्तिक घायाळ हा सिगारेट मागण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. मात्र, उशीर झाल्याने सिगारेट देण्यास नकार दिल्यावर तो तेथून निघून गेला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी रस्त्यात भेट झाल्यावर फिर्यादीने त्याला याविषयी विचारणा केली असता आरोपीने कोणतेही उत्तर न देता निघून जाणे पसंत केले.
दरम्यान, १२ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या गुंफाबाई नाचन यांनी घराचे दार वाजवून तुमची दुचाकी जळत आहे, अशी माहिती दिली. बाहेर येऊन पाहिले असता घरासमोर उभी असलेली दुचाकी (एमएच-२०-जीआर-०१५९) आगीत जळत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. नागरिकांनी तातडीने पाण्याच्या टाकीतून पाणी आणून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोपेड पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीमुळे दुकानाचा बोर्ड व काही साहित्यही जळाले.
80 हजारांचे नुकसान
यानंतर तक्रारदाराने घराला लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये कार्तिक घायाळ याने दुचाकीवर पेट्रोल ओतून आग लावत असल्याचे समोर आले. या घटनेत दुचाकी जळून ८० हजार रुपये व दुकानाच्या साहित्याचे सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, आरोपी कार्तिक घायाळ याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.
हेदेखील वाचा : South Africa Wildfires : केप टाऊन हादरले! आकाशात धुराचे लोट आणि जमिनीवर आगीचे तांडव; दक्षिण आफ्रिकेत आणीबाणी






