पुणे : मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या टोळी प्रमुखासह दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. अनिल रमेश चव्हाण (वय २१, रा. अप्पर इंदिरानगर) व रोहित हेमंद बोंदरे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अनिल चव्हाण हा टोळी प्रमुख आहे. त्याने व त्याच्या ८ साथीदारांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात टोळी प्रमुख अनिल चव्हाण व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली होती. कारवाईनंतर टोळी प्रमुख अनिल चव्हाण व इतर फरार झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात पुर्वी ७ जणांना अटक केली होती. परंतु, टोळीप्रमुख असलेला अनिल चव्हाण व रोहित बोंदरे हे दोघे पसार होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांचा शोध घेऊन देखील ते मिळत नव्हते. या दरम्यान, पोलीस अंमलदार अतुल महांगडे यांना माहिती मिळाली की, दोघेजन रोहीत बोदरे याच्या घरी येणार आहेत. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक संगिता जाधव तसेच, पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार जाधव तसेच त्यांच्या पथकाने या भागात सापळा रचला. दोघे येताच त्यांना पकडले. चौकशी केली असता ते मोक्कातील आरोपी असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.