शिरोली : जठारवाडी ( ता. करवीर ) ग्रामपंचायतीला गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा थांबवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी गावाच्या विविध भागातील पाण्याचे पाच नमुने तपासणीसाठी पाठविले होते. हे पाचही नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल मिळाला आहे. त्यामुळे कुपनलिकेव्दारे गावाला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीने आरओ द्वारे मिळणारे पाणी उपलब्ध केले आहे. तसेच टँकरद्वारे येणाऱ्या पाण्यात टीसीएस पावडर टाकून ते पाणी देण्यात येत आहे.
गावात भीतीचे वातावरण
दरम्यान गॅस्ट्रो सदृश आजाराने आज सकाळी पहिला व सायंकाळी दुसरा बळी घेतला असल्याची चर्चा गावात आहे. हे दोन्ही मृत्यू गावातून बाहेर गेल्यानंतर झाले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बळवंत श्रीपती पाटील (वय ७०) व पोपट भानुदास जाधव (वय ३५) असे मृतांचे नाव आहे. बळवंत पाटील हे काल महे (ता.करवीर) येथे असणाऱ्या मुलीकडे भाजीपाला देण्यासाठी गेले होते. सायंकाळी जठारवाडीला परत येण्यासाठी घरातून बाहेर पडत असताना त्यांना उलटी झाली. त्यांनंतर त्यांना उलटी व जुलाब सुरू झाले. त्यामुळे मुलीने त्यांना बिडशेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचार सुरू असताना शनिवारी ( ता. १२ ) सकाळी सहा वाजता त्यांचा मुत्यु झाला. साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह जठारवाडीत आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पोपट जाधव हे काल रात्री गावातील अन्य तरुणांसोबत प्रवासी बसने अनिरुद्ध बापूंच्या पादुका आणण्यासाठी मुंबईला गेले होते. आज सकाळी त्यांनाही अचानक जुलाब व उलटी सुरू झाल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या तरुणांनी त्यांना पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाची सहा पथके जठारवाडीत
काल रात्रीपासून बारा रुग्णांनी नव्याने उपचार घेतले. तर भुये प्राथमिक आरोग्य केंद्र व कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल असणाऱ्या २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाची सहा पथके जठारवाडी गावात कार्यरत असून योग्य खबरदारी व उपाययोजना सुरू असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी जठारवाडी गावात भेट दिली. मात्र गॅस्ट्रो सदृश्य साथीच्या आजारात एकही लोकप्रतिनिधी जठारवाडीत फिरकलेला नाही. याबाबत ग्रामस्थांमधून खंत व्यक्त होत आहे.